मुंबई, 3 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. विद्या चव्हाण आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांविरूद्ध सुनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यावर पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर येत आहे. विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप फेटाळून लावले आहेत. विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्क साधला', अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
'कायद्याचा चुकीचा वापर'
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की,'नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आलं आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलीला देखील मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. त्यामुळे मुलाला दुसरीही मुलगी झाली म्हणून माझ्यावर करण्यात आलेले हे आरोप चुकीचे आहेत. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं असून कायदा दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही करण्यात येऊ शकतो. कायद्याचा कुणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल'.
16 जानेवारी रोजी एफआयआर
विद्या चव्हाण यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने 16 जानेवारी रोजी एफआयआर दाखल केला होता. पण त्याची कोणतीच चौकशी झाली नाही. यावर पोलिसदेखील बोलण्यास तयार नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर भादंवि कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.