....आणि आमदार उद्धव ठाकरे गेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेटीला!

....आणि आमदार उद्धव ठाकरे गेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेटीला!

विधान परिषद बिनविरोध झाली आणि उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा प्रश्नही मार्गी लागला. परंतु, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये राज्यपाल विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला होता.

  • Share this:

मुंबई, 18 मे : महाराष्ट्रात कोरोनाचे महासंकट उभे ठाकले असताना काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर खुर्ची टिकवण्यासाठी मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु, अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात उद्धव ठाकरे यांना आमदारकी सिद्ध करायची होती. परंतु, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वच प्रकारच्या निवडणुका रद्द करणाऱ्यात आल्या होत्या.

निवडणुका रद्द झाल्यामुळे उद्धव ठाकरे आमदार कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी, असं पत्र 5 एप्रिल रोजी देण्यात आले होते. जर असं झालं असतं तर कोरोनाच्या परिस्थितीत विधान परिषद निवडणुकीची गरज भासली नसती.

हेही वाचा - गावी आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी असं केलं क्वारंटाइन की, कुणालाही येईल राग!

परंतु, भाजप नेत्यांच्या राजभवनावर बैठका आणि राज्यपालांनी महाविकासआघाडीची शिफारस न स्वीकारल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राज्यपालांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहण्याचा निर्णय घेतला.  तब्बल महिना उलटला तरी राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची सदस्य नियुक्त म्हणून स्वाक्षरी केलीच नाही.

त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 'राजभवन हा राजकीय अड्डा बनू नये' अशी खोचक टीका केली होती. त्यानंतर भाजप आणि सेना नेत्यांमध्ये चांगलाच राजकीय आखाडा तापला होता. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेत्यांनी मधला मार्ग निवडत राजभवनावर जाऊन राज्यपालांशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. पण, यातूनही कोणताच तोडगा निघाला नाही.

त्यानंतर महाविकासआघाडीकडून पुन्हा एकदा राज्यपालांना स्मरण म्हणून पत्र देण्यात आलं होतं. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेतून काही मार्ग निघेल अशी दाट शक्यता होती. त्यानंतर राज्यात पुढील राजकीय घडामोडींना वेग आला.

अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक घ्यावी, अशी शिफारस राज्यपालांकडे केली. त्यानंतर राज्यपालांनी तातडीने निवडणूक आयोगाकडे तशी शिफारस पुढे पाठवली.  देशभरात लॉकडाउनमध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काटेकोर नियमांचं पालन करून निवडणूक घेणे शक्य आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाने परवानगी दिली.

हेही वाचा -धक्कादायक! अयोध्येत भरदिवसा गोळीबार, BJP नेत्यासह दोघांची हत्या

परंतु, विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असली तरी बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण, काँग्रेसकडूनच सहावा उमेदवार देण्यात आला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दुसरा उमेदवार मागे घ्यावा लागला.

अखेरीस विधान परिषद बिनविरोध झाली आणि उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा प्रश्नही मार्गी लागला. परंतु, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये राज्यपाल विरुद्ध शिवसेनास राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेरीस शेवट गोड म्हणून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर राज्यपालांना भेटायला गेले. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

 

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या