शिवरायांचा संदेश देत राज ठाकरेंच्या आवाजात मनसेकडून VIDEO प्रसिद्ध

शिवरायांचा संदेश देत राज ठाकरेंच्या आवाजात मनसेकडून VIDEO प्रसिद्ध

या दोन्ही व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : मनसेच्या महाआधिवेशनाचा तारीख जवळ आली असताना मनसेकडून दोन व्हिडिओ रिलीज करण्यात आले आहेत. या व्हिडिओला स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिला आहे.

या दोन्ही व्हिडिओमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. छत्रपतींच्या लढाईसाठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडिओमध्ये आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस  घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेने सुरू केल्याचं दिसतं आहे.

मनसेचा जुना झेंडा बदलला

दरम्यान, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.

मनसेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचं महाअधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडा बदलत मनसे कात टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कसा असेल मनसेचा नवा झेंडा?

मनसेचा चौरंगी झेंडा आता बदलणार आहे. आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्या अग्रभागी होता. आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवेकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केलंय. काहीनी तर चक्क मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला दिला. पण हे सांगतानाच शिवसेनेचं हिंदुत्व अद्यापही कडवटच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.

First published: January 21, 2020, 7:01 AM IST

ताज्या बातम्या