'एकच गोष्ट मिस करतेय', 'मातोश्री'वर पोहोचल्यावर ऊर्मिला मातोंडकर यांचा पहिला VIDEO
आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackery) यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचल्या होत्या.
मुंबई, 01 डिसेंबर: बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) अखेर हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर प्रवेश सोहळा पार पडला आहे.
आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऊर्मिला मातोंडकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. सर्वात आधी ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले होते. बाळासाहेब आज असायला हवे होते, त्यांची उणिवा आज जाणवत आहे, असं यावेळी ऊर्मिला म्हणाल्या.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधून ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तसंच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीवर हजर होत्या.
अभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH
विशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच ऊर्मिला मातोंडकर यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार होता, त्याची औपचारिकता अखेर आज पार पडली आहे.
दरम्यान, ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर शिवसेनेनं कोणती जबाबदारी सोपवली आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जुहू इथं ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आपल्याला कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, काय आपली भूमिका असणार आहे, याबद्दलचा खुलासा मातोंडकर करण्याची शक्यता आहे.