अनिरुद्ध जाहगीरदार,प्रतिनिधी
ठाणे , 25 मार्च : ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. ठाण्यात जवळजवळ चाळीसच्यावर तलाव अस्तित्त्वात आहेत. येथील तलाव आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर यांच्यामुळे ठाणे शहराला एक वेगळं रूप आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख लाभली आहे. या तलावांपैकीच उपवन तलाव हा फार प्रसिद्ध आहे. हा तलाव नागरिकांना विरंगुळा म्हणून लाभलेले हक्काचे ठिकाण आहे.
काय आहे तलावाची ओळख?
उपवन तलाव हा प्रकर्षाने संस्कृती कला महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी ओळखला जातो. पाणी पुरवठ्याच्या उद्देशाने जे. के. सिंघानिया यांनी या तलावाची पुनर्बांधणी केली होती. त्यांनी या ठिकाणी गणपतीचे मंदिरही बांधले होते. गावंडबाग, शिवाई नगर, गणेश नगर, वसंत विहार आणि वर्तक नगर जवळ हा तलाव आहे.
वयोवृद्धांचे हक्काचे ठिकाण
प्रत्येक वयोगटातील लोक या तलावाला भेट देण्यासाठी येतात. येथील प्रदूषणविरहित निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात आणि मनाला शांती मिळवतात. त्यातल्या त्यात हा तलाव प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिकांचे हक्काचे ठिकाण आहे. या तलावाकाठी असलेला फूटपाथवर दररोज सकाळ संध्याकाळ असंख्य वृद्ध नागरिक येतात, फिरतात, व्यायाम करतात, समवयस्कांसोबत गप्पागोष्टीकरून वेळ घालवतात आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.
विरंगुळा करून आनंद लुटतात
फिरून व व्यायाम करून थकवा जाणवल्यास नाकरिकांना झाडांखाली व अन्य जागीही बसायची सोय देखील आहे. या सोयीसुविधांचा लोक पुरेपूर फायदा घेतात व तलावाकाठी बसून विरंगुळा करून आनंद लुटतात. त्याचसोबत तेथेच चौपाटी सुद्धा आहे जेथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि लोकं त्याचा आनंदाने आस्वाद घेत असतात.
Best Sea Food : कोकणातील सी फूड ठाण्यात, नणंद भावजयीच्या ट्रकमध्ये मिळतात ताजे मासे, Video
फिरायला आल्यानंतर बरं वाटतं
उपवन तलावावर फिरायला आल्यानंतर बरं वाटतं. येथे असलेलं गणपतीचं मंदिर, तलावात असलेली शंकराची मूर्ती हे मला खुप आवडते, असं दररोज येथे फिरायला येणाऱ्या प्रफुल्ल भिसे यांनी सांगितले.
प्रदूषण नाही
येथे प्रदूषण नाही म्हणून येथे फिरायला आवडते, असं येथे जवळ जवळ 50 वर्षांपासून रोज सकाळ संध्याकाळ फिरायला येणाऱ्या श्यामशेर यादव यांना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.