मुंबई विद्यापीठाची 31 तारखेची डेडलाईन हुकणार, कुलगुरूंचाच 'निकाल' लागणार ?

मुंबई विद्यापीठाची 31 तारखेची डेडलाईन हुकणार, कुलगुरूंचाच 'निकाल' लागणार ?

मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैला लागणारच अशी गर्जना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली खरी पण 31 जुलैला निकाल लागणार नाही असं चित्र आहे

  • Share this:

28 जुलै : मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैला लागणारच अशी गर्जना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली खरी पण 31 जुलैला निकाल लागणार नाही असं चित्र आहे. तसंच निकालाचा घोळ घालण्यास जबाबदार असलेल्या कुलगुरू संजय देशमुखांवर कारवाई अटळ असल्याचं विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलंय.

अजूनही खूप पेपर तपासणं शिल्लक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं पेपर तपासल्यानंतर  मार्क एकत्र करुन मार्कशीट तयार करणं शक्य नसल्याचं सांगण्यात येतंय.

त्यामुळे राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळण्यात सरकार आणि विद्यापीठ अपयशी ठरलंय. विशेष म्हणजे आजही शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र 31 जुलैला निकाल लागतीलच असं ठामपणं सांगतात.

मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीचा बोजवारा उडालेला असताना सरकार मात्र कुलगुरूंना पाठिशी घालत असल्याचं चित्र आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या आग्रहानं मेरी ट्रॅक या कंपनीला ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट देण्यात आलं. तीन महिन्यांत निकाल लागणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. पण देशमुखांनी कंत्राट रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचं उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांनी म्हटलं.

विरोधक आणि स्वतः राज्यमंत्री विद्यापीठातल्या निकालांच्या गोंधळाला देशमुख हेच जबाबदार असल्याचं वारंवार सांगतायेत. विद्यापीठाच्या 477 पैकी फक्त 51 परीक्षांचे निकाल लागलेत. या गोंधळाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होतेय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं मात्र वेगळंच आहे. कुलगुरूंवर कारवाई राज्यपाल करतील असं सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय.

शिक्षणमंत्री निकालाला प्राधान्य असं म्हणतायेत ना मग 31 जुलैपर्यंत निकाल लावा... पण निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करण्यापर्यंतची वेळ का आली याची चौकशी करणार की नाही असा सवाल विचारला जातोय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं सरकार सांगत असलं तरी परदेशात आणि इतर विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होणार हे मात्र निश्चित झालंय.

First published: July 28, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या