या गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट

उल्हासनगर महापालिकेनं रहिवासी भागातच अनधिकृतपणे डम्पिंग सुरू केलंय. त्यातून निघणाऱ्या दुर्गंधी आणि धुरामुळे या भागातील तरुण-तरुणींची सोयरिकी जुळत नसल्याने त्यांचे विवाह खोळंबले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 06:42 PM IST

या गावात जुळत नाहीय सोयरीक, कारण ऐकाल तर पडाल चाट

गणेश गायकवाड, उल्हासनगर, 13 नोव्हेंबर - उल्हासनगरात कचऱ्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. म्हारळ परिसरात डम्पिंगची क्षमता संपल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेने अनधिकृतपणे कॅम्प नंबर पाचमधील महात्मा फुले नगराच्या रहिवासी भागातच डम्पिंग सुरू केलंय. दरम्यान डम्पिंगच्या धुरामुळे इथल्या नागरिकांचा दिवस संध्याकाळी 5 वाजताच संपतो. या समस्येनं इतकं रौद्र रूप धारण केलंय की, या भागातील तरुण-तरुणींची सोयरिकी जुळत नसल्याने त्यांचे विवाह खोळंबले आहेत.


मंदा डोहीफोडे या गेल्या दोन वर्षांपासून महात्मा फुले नगर भागात राहतात. डोहीफोडे कुटुंबाचा दिवस सायंकाळी 5 वाजताच संपतो. याचं कारण आहे, इथल्या डंपिंग ग्राऊंडमधून निघणारी दुर्गंधी आणि धूर! डम्पिंगच्या कचऱ्यामधून निघणारी दुर्गंधी आणि धुरामुळे सायंकाळीच त्यांना दारं खिडक्या लावून घरात स्वतःला कोंडवून घ्यावं लागतं. आता तर या डम्पिंगचा त्रास इतका वाढलाय की, त्याचे नातेवाईक देखील त्यांच्या घरी यायला तयार होत नाहीत. मंदा डोहिफोडे यांच्या सारखे असंख्य कुटुंबांची हीच अवस्था आहे.


''डम्पिंगचा त्रास इतका वाढलाय की, त्यातून निघणारा सगळा धूर घरात येत असल्यामुळे घरातील सर्वाना खोकल्याचा त्रास होतोय. दुर्गंधीमुळे तर प्रत्येकजण आजारी पडताहेत. लहाम मुलांना याचा त्रास जास्त होतो'', असे मंदा डोहीफोडे म्हणाल्या. तर, याच भागातील रहिवाशी रुख्मिणी सोनवणे सांगतात की, ''सायंकाळी दिवे लागणीची वेळ होताच आम्हा सर्वांना घराच्या खिडक्या दारं बंद कराव्या लागतात. प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे पाहुण्यांनीसुद्धा आमच्याकडे यायचं बंद केलंय.''

Loading...


इतकंच काय तर या भागातील तरुणांची लग्न देखील या डम्पिंगमुळे खोळंबली आहेत. मुलीकडचे सोयरक करायला मुलाच्या घरी येतात. मात्र, घरा शेजारीच असलेल्या डम्पिंगमधून पसरलेली दुर्गंधी आणि धुरामुळे ते सोयरिकी न जुळवता निघून जातात.


''या भागात लग्नाचं प्रमाण आता कमी झालंय.  मला स्वतःला हा त्रास भेडसावतोय. मुलीकडचे जेव्हा घर बघायला येतात, तेव्हा त्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. धुरामुळे येथल्या नागरिकांचे जे हाल होताहेत ते पाहून मुली देण्याचं ते टाळतात. येथले वातावरण पाहून माझ्या दोन-तीन सोयरीक मोडल्या आहेत'', असं या भागातील रहिवासी आबासाहेब वाघमारे सांगतात.


उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील 'राणा खदान' या डंपिग ग्राऊंडची क्षमता दोन वर्षांपूर्वीच संपूष्टात आली. त्यानंतर महापालिकेने महात्मा फुले नगर या रहिवासी भागात अनधिकृतपणे कचरा टाकण्यास सुरूवात केली. आजच्या घडीला शहरातला ४०० मेट्रिक टन कचरा दरदिवशी या अघोषित डम्पिंगवर टाकला जातोय. पावसाळ्यात कचऱ्यातून निघणारी दुर्गंधी आणि आता डम्पिंग सतत धगधगत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा श्वास गुदमरतोय. मात्र, जो पर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तो पर्यंत याच ठिकाणी कचरा टाकावा लागले असे आयुक्ताचे म्हणणे आहे.


''गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्यावतीने या भगात कचरा टाकला जातो. महापलिकेने 30 एकर जमिनीचा मागणी केली आहे, परंतू अद्याप ती मिळालेली नाही. स्वच्छ भारत अभियानात नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. नागरिकांनी ओला कचरा जागेवरच जीरवावा. दुर्गंधी येऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीनं फवारणी केली जातेय. नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उल्हासनगर भागात डंपिगसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे त्याठिकाणी कचरा टाकला जातोय. लवकरच त्यावर तोडगा काढू'', असं उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अच्युत हंगे म्हणाले.


प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि शासनाने नियमांची पायमल्ली करत या ठिकाणी महापालिकेला डंपिग सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचा आरोप 'कायद्याने वागा' या संघटनेने केला आहे.


''डम्पिंग हा प्रकारच बंद आहे, लँड फिलिंग हा प्रकार केला जातो. त्यासाठीसुद्धा राज्य शासनाची परवानगी लागते. पण महापालिकेनं कुठलाच नियम पाळलेला नाही. ही महालिका 13 कि.मी. क्षेत्राची आहे, त्यावर 65 कोटी रूपये वर्षाकाठी खर्च केले जातात. सर्व ठेकेदारी सुरू असून, हा चक्क कचऱ्यातून मलीदा खाण्याचा प्रकार सुरू आहे'', असं कायद्याने वागा या संघटनेचे पदाधिकारी राज असरोंडकर यांनी सांगितले.


धक्कादायक बाब म्हणजे, इथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाच्या 500 फुटांच्या अंतरावर हे डम्पिंग असल्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानासुद्धा महापालिकेच्यावतीने या भागात कचऱ्याचे मनोरेच्या मनोरे रचले जात आहेत.


घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाकाठी महापालिका खर्च करते ६४ कोटी

उल्हासनगर महापालिका शहरातील घनकचऱ्यासाठी वर्षाकाठी ६४ कोटींचा निधी खर्च करते. यात सफाई कर्मचारी, अधिकारी यांच्या पगारासाठी ३२ कोटी, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी, प्रशासकीय खर्च २ कोटी, डंपिग ग्राऊण्ड आणि व्यवस्थापनासाठी २.५४ कोटी, डस्टबीन पुरवठ्यासाठी ६ कोटी, मशिनद्वारे सफाईसाठी १.५२ कोटी, डेब्रीज वाहतुकीसाठी १.८० कोटी, जंतुनाशके खरेदी करण्यासाठी २ कोटी असा खर्च महापालिकेच्यावतीने वर्षाकाठी केला जातो.


VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...