मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'महापोर्टल'प्रकरणी घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'महापोर्टल'प्रकरणी घेतला मोठा निर्णय

पुढील आठवड्यात होणाऱ्या या परीक्षा ढकलल्या पुढे...

  • Share this:

सागर कुलकर्णी,

मुंबई,7 डिसेंबर: महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले आहेत.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचारक पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

बैठकीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही सुरू असलेले विविध प्रकल्पांबाबत प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सादरीकरण केले. यामध्ये सर्व ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक नेटवर्कने जोडण्याचा भारतनेट टप्पा 2, आपले सरकार सेवा केंद्रे, नागरी महानेट प्रकल्प, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आदी प्रकल्पांविषयी माहिती दिली. महाराष्ट्राची ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी सज्जतेच्या दृष्टीने गतीने कार्यवाही सुरू असून देशात सर्वप्रथम आपले राज्य ब्लॉकचेनसाठी सज्ज असल्याची घोषणा करण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय डेटा सुरक्षिततेसाठी सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) चे उद्घाटन झाले. राज्य शासनाच्या ‘स्टेट डेटा सेंटर’च्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा तसेच क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे सेंटर स्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, महाआयटीचे महाव्यवस्थापक अजित पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव स्वाती म्हसे-पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी केली होती ही मागणी..

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या निर्णयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शासकीय नोकरभरतीत महापोर्टल हे डिजिटल व्यासपीठ मददगार न ठरता अडथळा ठरतं आहे. म्हणून ते बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

राज्यातील संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर 'आमचं सरकार आलं की महापोर्टल बंद करू', असे आश्वासन सुळे यांनी दिले होते. मागील सरकारने शासकीय नोकर भरतीसाठी हे पोर्टल सुरू केले होते. पण यामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 08:49 PM IST

ताज्या बातम्या