मुंबई, 16 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे मुख्य शिवसेनेला भलंमोठं खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 39 आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या आमदारांची संख्या बंडखोरांमध्ये सर्वाधिक होती. त्यामुळे शिवसेनेसाठी बंडाची ही जखम प्रचंड भळभळती आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसैनिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबईतील अनेक नगरपालिका, महापालिकांचे जवळपास सर्वच नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. मुख्य शिवसेनेतून सुरु असलेली ही गळती पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे आता लवकरच पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वत: मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावे घेणार आहेत. शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देण्याचं आणि आणखी आक्रमक करण्याचं ध्येय उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरेंचा शिवसेनेला नव्याने उभारण्याचा संकल्प
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिंदेंच्या बंडापासून उद्धव ठाकरे दररोज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. ते सत्तेत असलेले आमदार-खासदारांना ज्यांना शिंदे गटात सहभागी व्हायची इच्छा आहे ते जावू शकतात, असं रोखठोकपणे सांगत आहेत. तसेच शिवसेना आपण पुन्हा नव्याने उभारणार, असं उद्धव ठाकरे याआधीच म्हणाले आहेत.
('बहुमत पाकीटमारीमधून मिळवलं, दोघांचं मंत्रिमंडळ म्हणजे...' राऊतांचा घणाघात)
उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी नगरपरिषद निवडणुकी संदर्भात महत्त्वाचे आदेश दिले होते. उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना सर्वसामान्यांमध्ये पक्षाची भूमिका पोहोचवा. आपण सरकारमध्ये केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यामाध्यमातून जास्तीत जास्त जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या होत्या.
लढाईला तयार राहा. कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या. आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. तळागाळात जावून लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्ष काम करतोयत्याप्रमाणे राज्यातही कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena, Uddhav thackeray