उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, शरद पवारांनीच केला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, शरद पवारांनीच केला खुलासा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची बैठक संपली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची बैठक संपली. या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्त्व करावं असा एकमताने निर्णय झाला आहे, असा महत्त्वाचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकासआघाडी सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक सुरू आहे. तब्बल दोन तासांपासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपद आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचं कळतंय.

बैठक आटोपून शरद पवार बाहेर आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, 'उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्त्व करावी, यावर आमचं एकमत झालं आहे. या निर्णयावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबद्दल निर्णय जाहीर केला जाईल', अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच सर्व काही ठराव हा लिखित स्वरूपात केला जात आहे, असंही पवारांनी सांगितलं.

शरद पवार यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही बाहेर पडले. आज तिन्ही पक्षांची एकत्र बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली आहे. कोणताही मुद्दा सुटू नये म्हणून अजून चर्चा सुरू आहे, याबद्दल पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची अजूनही बैठक सुरू आहे. या बैठकीत अजून काय ठरतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

या बैठकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीतील नेते मलिक्कार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सत्तास्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झालं. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या