400 कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपलं होतं का?, शिवसेनेचा सवाल

400 कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपलं होतं का?, शिवसेनेचा सवाल

सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तितके शेतकऱ्यांसाठी का केले जात नाहीत, शिवसेनेचा सरकारला सवाल

  • Share this:

02 मे : तूर विक्रीवरून राज्यात शेतकरी हैराण झाला असताना 400 कोटींचा तूरडाळ घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची कबुली दिली. हा घोटाळा होत असताना सरकार झोपले होते काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. शिवसेनेने आज पुन्हा एकदा 'सामना'च्या अग्रलेखातून तूर घोटळ्यावरून  भाजपला धारेवर धरलं आहे. तूर डाळीचा घोटाळा खरंच झालाय का? आणि झाला तेव्हा सरकार झोपले होते काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण 400 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वत: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार नसून पारदर्शक असे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर फोडता येणार नाही. 400 कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय? 400 कोटी हा सरकारी आकडा आहे. हा आकडा 700-800 कोटींपर्यंत सहज असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज नसल्यामुळे हे सर्व घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे ठीक आहे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही आणि मुख्यमंत्र्यांना सरकारी केंद्रावरील व्यापाऱ्यांच्या तूरडाळ घोटाळ्याचा अंदाज आला नाही. सरकार मस्त मजेत आणि खुशीत आहे व शेतकरी मात्र पानिपत झाल्यासारखा कोसळला आहे, राजकारणातले सर्व अंदाज बरोबर येतात. तेथे का चुका होत नाहीत? सरकार अस्थिर झाले तर कोणते मासे गळाला लावायचे आणि त्यांना काय द्यायचे, याचा अंदाज सरकारी यंत्रणेचा वापर करून येत असेल तर तोच अंदाज तूरडाळीच्या उत्पादन आणि नंतरच्या घोटाळ्यांबाबत का येऊ नये?, असं सवालही शिवसेनेने विचारला आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यावरून शिवसेनेने भाजपला जाब विचारला आहे. इतकेच नाहीतर सरकारच्या हवामान खात्याच्या कार्यक्षमतेवरच शिवसेनेने प्रश्न उपस्थित केला आहे. तूरडाळीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही हे मान्य करू. मग काल नाशिक, लासलगाव, सटाण्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस आल्याने सर्वच शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. निदान या अवकाळी गारपिटीचा तरी अंदाज आमच्या सरकारी यंत्रणेस यायलाच हवा होता, असा टोला सेनेने लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 10:05 AM IST

ताज्या बातम्या