मुंबई, 13 मार्च : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. पण आता याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे. 'यंदा तरी आदित्य निवडणूक लढवणार नाही,' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
'आदित्य ठाकरे यांच्यावर माझ्याकडून कसलंही बंधन नाही, निवडणूक लढवायची की नाही तोच ठरवेल. मात्र 'यंदा तरी आदित्य निवडणूक लढवणार नाही,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवारांवर भाष्य
'पार्थ पवार यांच्या निवडणुकीबाबत जर पाहिले तर पवार सांगतात त्याच्या विरुद्ध करतात. शरद पवार हे अष्टपैल्लू आहेत. नेते म्हणून ते चांगले आहेत, पण भविष्य कधीपासून सांगायला लागले. ज्योतिषी कधीपासून झाले?' असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरेंबाबत काय होती चर्चा?
'आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे', अशी बातमी एका मराठी वृत्तपत्राने दिली होती. 'आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते,' असंही या वृत्तात म्हणण्यात आलं होतं.
VIDEO : काँग्रेसमध्ये वाद पेटला, बाळासाहेब थोरात विखेंवर बरसले