'आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..' सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद; मांडले हे 3 मुद्दे
'आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..' सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद; मांडले हे 3 मुद्दे
उद्धव ठाकरे यावेळी तीन मुद्द्यांवर बोलले. पहिल्या मुद्द्यात त्यांनी अमित शाह यांनी दिलेल्या शब्दाचा उल्लेख केला. अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे शानदार सरकार कधीच आलं असतं
मुंबई 01 जुलै : राज्याच्या राजकारणात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून भरपूर हालचाली सुरू होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यावेळी तीन मुद्द्यांवर बोलले. पहिल्या मुद्द्यात त्यांनी अमित शाह यांनी दिलेल्या शब्दाचा उल्लेख केला. अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे शानदार सरकार कधीच आलं असतं. अडीच वर्ष भाजप आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असता. मात्र, आता पाच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना अधिकृत सोबत होती. तेव्हा हेच ठरलं होतं की अडीच वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल. मग मला का मुख्यमंत्री बनायला लावलं. हे घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. अडीच वर्षांपूर्वी पाठीत खंजीर खूपसला आणि आता हे का? कदाचित पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दुःख झालं आहे. माझा राग असेल तर माझ्या पाठीत वार करा. मुंबईच्या काळजात कट्यार खूपसू नका, असंही ठाकरे म्हणाले.
आरे प्रकरण - मी कांजूरमार्ग पर्याय सुचवला होता. कदाचित त्यांना त्यांचं आणि मला माझं बरोबर वाटतं असेल. आजही हात जोडून विनंती करतो की माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. आरेचा आग्रह रेटू नका. मुंबईकरांच्या वतीने हात जोडतो, ही जमीन महाराष्ट्राची आणि मुंबईची आहे. ती त्यांच्या हितासाठी वापरा, असंही ठाकरे म्हणाले.
लोकशाहीचे आधारस्तंभ -
उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. या चारही स्तंभांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही वाचवायला पाहिजे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास मोडत चालला आहे. आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे. मात्र ज्याने मतदान केलं त्याला तर माहिती पाहिजे की आम्ही कोणाला मतदान केलं. माहीमच्या मतदाराने टाकलेलं मत सुरत गोवामध्ये फिरयालला लागलं तर लोकशाही कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.