मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. त्यांच्या या शपथविधीला देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला जाण्यास आवडलं, अशी इच्छा राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांनी बोलून दाखवली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नेते शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
ठाकरे घराण्यातून उद्धव हे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहे. त्यामुळे घरातील सदस्य आवर्जून हजर राहणार आहे. यासाठीच आज सकाळी उद्धव यांनी स्वत: फोन करून राज यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे.
दरम्यान, राज यांचा मुलगा अमित यांनीही, 'शपथविधी सोहळ्याला मला जायला आवडेल', असं सांगितलंय. 'मातोश्री'वरून निमंत्रण आल्याचं अजून ठाऊक नसून घरी गेल्यावर कळेल. मात्र, शपथविधी पहायला आवडेल, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे आज नवी मुंबईत मनसेच्या मोर्चासाठी आले होते. नवी मुंबईतील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामकागारांना त्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्त्व अमित यांनी केलं.
हे नेते घेणार शपथ
शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई शपथ घेणार आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे शपथ घेतील. तर कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे शपथ घेणार आहे. उर्वरीत मंत्र्यांचा शपथविधी हा 3 डिसेंबरनंतर होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मंचावर 'बळीराजा'स मान
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 85 किलोमीटर अनवाणी चालत विठुरायाला साकडे घालणाऱ्या शिवसैनिकाची इच्छा अखेर पूर्ण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते. यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घातले की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा'.यानंतर त्यांनी चंद्रभागा पाण्याने भरलेला कलश आणि तुळशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट दिली. या शपथविधी सोहळ्याचे सावंत दाम्पत्याला विशेष निमंत्रण आले आहे.
24 तासांत उभारले 6000 चौरस मीटरचे व्यासपीठ...
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी राज्याभिषेकासारखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भव्य व्यासपीठ उभारत आहेत. 24 तासांत 60 हजार चौरस मीटरचे व्यासपीठ उभारले जात आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या बाजूला व्यासपीठामागे शिवरायांचा पुतळा आणि समोर शिवराज्याभिषेकाचे शिल्प असणार आहे. महाराष्ट्राची भव्यता आणि इतिहास या मंचाद्वारे मांडला जाईल. मंचावर 100 जणांच्या बसण्याची सोय असेल. 30 हजार खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे 1 लाख लोक येथील अशी अपेक्षा आहे. तसंच 20 ते 25 भव्य एलईडी स्क्रीनही असतील.