'मातोश्री'कडे सगळ्याचे लक्ष... सकाळी बोलू, ऐवढंच बोलून 'सिल्व्हर ओक'बाहेर पडले उद्धव

'मातोश्री'कडे सगळ्याचे लक्ष... सकाळी बोलू, ऐवढंच बोलून 'सिल्व्हर ओक'बाहेर पडले उद्धव

राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

  • Share this:

मुंबई,22 नोव्हेंबर: राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. सत्ता स्थापनेबाबत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक'वर भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर आपण सकाळी बोलणार, ऐवढेच बोलून उद्धव ठाकरे 'सिल्व्हर ओक'बाहेर पडले. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सर्व शिवसेना आमदारांची शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेची सत्तास्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज होणाऱ्या राजकीय घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

'मातोश्री'वर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना आधारकार्ड, कागदपत्रे आणि 5 दिवसांचे कपडे सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात महामहाविकासआघाडीचे सरकार सत्तास्थापनेच्या घडामोडी घडणार आहेत. काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे उशीरा सिल्व्हर ओक येथील शरद पवार, अजित पवार यांची तब्बल दीड तास चर्चा केली. सत्तास्थापनेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी मित्र पक्षांची बैठक दुपारी 12 वाजता धनंजय मुंडे यांच्या बी-4 या बंगल्यावर होणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्यांची बैठक दुपारी एक वाजता विधानभवन येथे होणार आहेत. या बैठकीला काँग्रेसच्या 44 आमदारांना बोलवण्यात आला असून गटनेता निवडीबाबत काँग्रेस पक्ष श्रेष्ठ चर्चा करतील तसंच सत्ता स्थापनेबाबत दिल्लीत झालेल्या राजकीय घडामोडीची माहिती देखील आमदारांना दिली जाईल. या सर्व आमदारांची साक्षऱ्या घेतल्या जातील, असे सांगितले होते.

गटनेत्यांची निवड दिल्लीतून..

गटनेता निवडीसाठी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नाना पटोले यासह काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. विधिमंडळ गटनेत्यांची निवड दिल्लीतून जाहीर होईल, असे समजते. काँग्रेस विधिमंडळ गटनेत्यांच्या निवडीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शिवसेना पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. आठवड्याभरापासून नवी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक पार पडल्या. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत.

महाशिवआघाडी नव्हे महाविकासआघाडी

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकत्रित आघाडीमुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, यावेळी काँग्रेसने अनेक अटी घातल्याचे समजते. सर्वात महत्वाचं म्हणजे महाशिवआघाडीऐवजी नव्या आघाडीचे नाव महाविकासआघाडी असेल, अशी अट काँग्रेसने घातली आहे. त्यामुळे आता 'शिव' शब्द वगळला जाऊन महाविकासआघाडी असे नवे नाव जन्माला आले आहे.

असा ठरला फॉर्म्युला!

त्याचसोबत काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 11-11-11 असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा अजेंडाही सोडावा लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची सूचना केली आहे. सोनियांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचं कळतंय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असं आघाडीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेला 5 की अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या