मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमत्र्यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमत्र्यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रेयत त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने समाधान व्यक्त केलं आहे.

मुंबई, 20 जुलै : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला खूप मोठं यश आल्याचं मानलं जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई बघायला मिळत आहे. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही श्रेयवादाची लढाई नसल्याचं म्हटलं आहे. ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रेयत त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने समाधान व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

(युवा सेनेतून वरुण सरदेसाईंना डच्चू? एकनाथ शिंदेंच्या गोटातून आला मोठा खुलासा)

"हा तिढा अवघड होता पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही", अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

First published:

Tags: Shiv sena, Uddhav thackeray, ओबीसी OBC