मुंबई, 05 जुलै: एकीकडे भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. पण, दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजूनही कटूता मात्र तितकीच कायम आहे. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एकमेकांसमोर आले पण नमस्कार न करता दुर्लक्ष करत निघून गेले.
पावसाळी अधिवेशनाला (Monsoon season Maharashtra) आजपासून सुरुवात झाली आहे. दोन दिवस अधिवेशन चालणार आहे. आज सकाळी सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि भाजपचे आमदार विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमदारांसह दाखल झाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री दाखल झाले.
विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी समोरासमोर येणे टाळले pic.twitter.com/CpAgDo0btp
— News18Lokmat (@News18lokmat) July 5, 2021
यावेळी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे एकमेकांसमोर आले पण नमस्कार न करता दु्र्लक्ष करत निघून गेले. फडणवीस अणि भाजप आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमत्री अजित पवार हे फडणवीस जाण्याची वाट पाहत होते.
फडणवीस आपल्या आमदारांसह विधान भवनाच्या दालनाकडे निघाले तेव्हा उद्धव ठाकरे आणि अजित पवार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे निघाले. यावेळी दोन्ही प्रमुख नेत्यांनी समोरासमोर येण्याचे खुबीने टाळले.
जर मनातलं बोलून नाते सुधारत असतील तर ही चांगली गोष्ट- मलिक
दरम्यान, विधानभवनात पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. 'कुणी काय तक्रार करत आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आरोप करत असताना यापूर्वी पण किरीट सोम्यांनी आरोप केले आहे. आता चंद्रकांत पाटील हे सुद्धा गडकरींवर आरोप करत आहे. त्यामुळे गडकरी यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे असं दिसून येत आहे, असंही मलिक म्हणाले.
दुसऱ्यांदा जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार होते, त्यावेळी सुद्धा गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गडकरींना अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले, आता पुन्हा एकदा गडकरींवर आरोप केले जात असल्यामुळे भाजपमधील अंतर्गत दिसून येत आहे, असंही मलिक म्हणाले.
'मन मिळाली नाही तरी चालले पण हातातून हात मिळाले पाहिजे. राजकारणात कटूता आणि शत्रूता कायम नसते. जर मनभेद असतील तर बोलून त्यावर मार्ग काढला पाहिजे. जर मनातलं बोलून नाते सुधारत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत मलिक यांनी फडणवीस यांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai