व्यसनमुक्ती केंद्रात तरुणीची निर्घृण हत्या..पोलिस तपासात धक्कादायक 'कृत्य' उघड

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणीची निर्घृण हत्या..पोलिस तपासात धक्कादायक 'कृत्य' उघड

किशोरीमुळेच आपल्याला केंद्रातून डिस्चार्ज मिळत नाही, असा गैरसमज ईशा आणि विशाखाचा झाला होता.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण, 30 नोव्हेंबर: व्यसनमुक्ती केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी एक तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रातीलच दोन तरुणींनी ओढणीने गळा आवळून या तरूणीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. टिटवाळ्याजवळच्या रायते गावात दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, किशोरी सावंत (वय-34) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे तर ईशा पांडे (वय-19), विशाखा कोटावे (वय-19) असे आरोपी तरूणींची नावे आहेत. किशोरीसह ईशा आणि विशाखा दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात मागील काही दिवसांपासून उपचार घेत होत्या. किशोरीमुळेच आपल्याला केंद्रातून डिस्चार्ज मिळत नाही, असा गैरसमज ईशा आणि विशाखाचा झाला होता. त्यामुळे दोघीही किशोरीचा तिरस्कार करत होत्या. केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी ईशा आणि विशाखाने किशोरीचा काटा काढण्यासाठी कट रचला. दोघींनी आधी किशोरीच्या जेवणात उवा मारण्याचे औषध मिसळले. जेवण केल्या नंतर किशोरीला गुंगी आली. नंतर दोघींनी ओढणीच्या मदतीने किशोरीचा गळा आवळून तिची हत्या केली. आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून किशोरीने आत्महत्या केल्याचा दोघींनी बनाव केला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

असा सापडला 'धागा'

किशोरीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी कल्याण येथील राणी रुख्मिणीबा रूग्णालयात नेण्यात आला. किशोरीने आत्महत्या नाही तर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी किशोरीसोबत राहणाऱ्या ईशा आणि विशाखा या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघींनी किशोरीची हत्या केल्याचे कबूल केले. या प्रकरणी ईशा आणि विशाखाला टिटवाळा पोलिसांनी अटक केली असून दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: November 30, 2019, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading