Home /News /mumbai /

मुंबईजवळ तरुण बाईक राईडसाठी मित्रासोबत घराबाहेर पडला, मात्र नंतर दोघांनीही गमावला जीव

मुंबईजवळ तरुण बाईक राईडसाठी मित्रासोबत घराबाहेर पडला, मात्र नंतर दोघांनीही गमावला जीव

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर : उत्साहाच्या भरात उचलेलं पाऊल कसं जीवावर बेतू शकतं, हे दाखवणारी घटना मुंबईजवळ घडली आहे. मुंबईतील जोगेश्‍वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवान व विरार पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबई-जोगेश्‍वरी हिंद नगर कॉलनी येथील 10 जणांचा ग्रुप दोन बाइक आणि एका कारने विरार पूर्वेतील भाटपाडा येथील तलावावर आला होता. या ग्रुपमधील मंगेश राणे ( 25) आणि सूर्यकांत सुवर्णा (34) हे दोघे तलावाच्या काठावर फोटो काढत असताना पाय घसरून पाण्यात पडले. दोघेही बुडू लागल्याने इतर तरुणांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. मंगेश राणे हा महिंद्रा अँड महिंद्र; तर सूर्यकांत सुवर्णा हा एजीसएस या खासगी कंपनीचा कर्मचारी आहे. दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे वसई-विरारमधील पर्यटनबंदी पालघर जिल्हा प्रशासनाकडून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वसई-विरारमध्ये पर्यटनासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटनबंदी असतानाही अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यंदाच्या कोरोना आपत्तीतही घडल्या आहेत. पोलीस व महापालिका प्रशासनाची नजर चुकवून वसईतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा सुट्टीच्या दिवशी राजरोस वावर दिसून येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग प्रतिबंध अधिनियम कायदा धाब्यावर बसवला गेला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Vasai

पुढील बातम्या