मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यपालांच्या आड ‘निपट डालो’ हा अजेंडा बरे नव्हे, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

राज्यपालांच्या आड ‘निपट डालो’ हा अजेंडा बरे नव्हे, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

'गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले'

'गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले'

'गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले'

    मुंबई, 18 ऑक्टोबर : 'एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. 'जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते.  महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळ्यात खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना ‘निपट डालो’ हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. 'प. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ‘ठाकरे’ आहेत याचा विसर त्यांना पडला व पुढचे महाभारत घडले' असा टोलाही राऊत यांनी लगावला. 'एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे' असंही राऊत म्हणाले. 'चीनच्या मदतीने आपण कश्मीरात पुन्हा 370 कलम लागू करू, असे डॉ. फारुख अब्दुल्ला उघडपणे म्हणाले. एक तर डॉ. अब्दुल्ला यांनी देशाची माफी मागायला हवी. नाही तर केंद्राने अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कश्मीर खोऱ्यात कुणाला तरी चीनचा सरळ हस्तक्षेप करायला हवा आहे व त्यावर देशाच्या गृहमंत्र्यांकडून कोणतेही प्रत्युत्तर नाही. आता प्रश्न इतकाच आहे की, डॉ. अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांना केंद्र सरकारने आधी तुरुंगात टाकले. कारण 370 कलम हटवायला त्यांचा विरोध होता. आता ते बाहेर आले तेव्हा चीनच्या मदतीची अपेक्षा ते करीत आहेत. कश्मीरपासून लडाख अडीचशे किलोमीटरवर आहे व आता लडाखच्या सीमेवर चीनने 60 हजार इतके सैन्य आणून उभे केले. या सैन्याने कश्मीरपर्यंत यावे व 370 कलम पुन्हा आणण्यात मदत करावी, असे बोलणे हा सरळ राष्ट्रद्रोहच आहे. देशांतर्गत स्थिती हाताबाहेर गेल्याचे हे चिन्ह आहे' असं परखड मतही राऊत यांनी व्यक्त केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या