मुंबई, 16 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे कधीच सहन केले जाणार नाही, असं म्हणत बदनाम करणाऱ्यांना इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा धागा पकडून फिल्मसिटीचं मुंबई बाहेर हलवण्याचा कुटील डाव असल्याची टीका केली आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी बॉलीवूडला बदनाम करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
'भुतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. एवढंच नाही तर फिल्मसिटीचं मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे' असा गंभीर आरोपही खोपकर यांनी केला.
'महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे' असंही खोपकर म्हणाले.
तर दुसरीकडे, राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बॉलीवूडची बदनामी झाली, असं मुख्यमंत्री म्हणत आहे. बॉलीवूडची बदनामी करतायत म्हणायचं आणि विनाकारण संघर्ष निर्माण करुन मूळ विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दाम, जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहेस असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
बॉलीवूडबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
'बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.