विरार, 30 जून: नालासोपारा (Nala Sopara) परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Couple commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पाळीव श्वानाच्या विरहात (Dog's Death) दाम्पत्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या आत्महत्येमागं आणखी काही कारणं आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
संबंधित घटना नालासोपाऱ्यातील गणेशनगर परिसरात घडली आहे. येथील रहिवासी असणारे 54 वर्षीय विजय कदम आणि 50 वर्षीय पत्नी जयश्री कदम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत विजय कदम हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. तर जयश्री या गृहिणी होत्या. त्यांना कोणतंही आपत्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी घरात एक कुत्रा पाळला होता. पण अलीकडेच या कुत्र्याचं निधन झालं. मृत दाम्पत्याला कुत्र्याच्या निधनाचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. विरह सहन न झाल्यानं शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वी संबंधित दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोविड सेंटरमध्ये काही दिवस उपचार घेतल्यानंतर दोन्ही दाम्पत्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ते दोघंही ठणठणीत बरे होऊन घरी परतले. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या कुत्र्याचं निधन झालं. श्वानाच्या निधनाचा त्यांच्या दोघांवर जबरदस्त मानसिक आघात झाला होता. यामुळे मागील काही दिवसांपासून दोघंही नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी सोमवारी दुपारी घराच्या छताला गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे.
हेही वाचा-VIDEO: कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारी
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला. दरम्यान संबंधित दाम्पत्य मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती शेजारच्यांनी दिली आहे. कुत्र्याच्या निधनानंतर त्यांची ही स्थिती झाल्याचंही शेजारच्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Suicide, Wife and husband