Home /News /mumbai /

शिवसेना-काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, सेना खासदाराची अमित देशमुखांवर सडकून टीका

शिवसेना-काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, सेना खासदाराची अमित देशमुखांवर सडकून टीका

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरून ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे.

मुंबई, 06 ऑक्टोबर : कोकणातला प्रकल्प थेट मराठवाड्यातील लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार आणि काँग्रेसच्या मंत्र्यामध्ये वाद पेटला आहे. 'महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये',  असं म्हणत सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरून ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे. काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या प्रकल्पाबद्दल मागणी केली आहे.    "आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. अमित देशमुख यांच्या या मागणीमुळे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे चांगलेच संतापले आहे. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा कोकणाच्या वाट्याला एक महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला मंजुरीही दिली आहे. तसंच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी अडाळी एमआयडीसीतील 60 एकर जागा सुद्धा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातला हा पहिला प्रकल्प आहे. पण, अचानक अमित देशमुख यांनी हा प्रकल्प लातूरला हलवण्याची मागणी करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे, हे पूर्वनियोजित असून अत्यंत निंदनिय आहे', अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे. 'आम्ही श्रीपादराव नाईक यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मिळवला होता. पण  सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत,' अशा शब्दांत विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. 'अमित देशमुख यांनी केली मागणी ही योग्य नाही. त्यामुळे ही बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयुष मंत्रालयाकडून याबद्दल विचारणा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गातच व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे, असंही विनायक राऊत यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या