हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार, राहुल गांधींना धक्काबुक्की प्रकरणावरून संजय राऊत संतापले

हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार, राहुल गांधींना धक्काबुक्की प्रकरणावरून संजय राऊत संतापले

देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल'

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे विरोधकांनी योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांना बोलू न देणे आणि राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर झालेला हा सामूहिक बलात्कार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

'गांधी कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले आहे. बलिदान दिले आहे. याचा विसर जर कुणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही',अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

'ज्या प्रकारे उत्तर प्रदेश पोलीस हे राहुल गांधी यांच्याशी वागत होते. त्यांची कॉलर पकडली आणि जमिनीवर पाडले. हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारे नाही. एका मुलीवर बलात्कार करून खून झाला. त्यासंदर्भात आवाज उठवायचा नाही. ही कुठली लोकशाही आहे. राहुल गांधी सारख्या नेत्याला कॉलर पकडून खाली पाडायचे की कोणती लोकशाही आहे. माझ्या मते हे या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हा सामूहिक बलात्कार आहे' असं परखड मत राऊत यांनी व्यक्त केलं.

' सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल' असा इशाराही राऊत यांनी दिला.

त्याचबरोबर, 'दुर्दैवाने देशाची आजची परिस्थिती चांगली नाही. देशातील प्रमुख आणि दलित नेते आहे. त्यांना अजून जाग आली नाही, हे दुर्दैव आहे' असं म्हणत राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावरही टीका केली आहे.

'हाथरस प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांना पाठवावे'

दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाबद्दल विनंती केली आहे.

'देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस  घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे.  उत्तर प्रदेशातील हाथरसमधील निर्भयाचा अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमधील पाटनामध्ये पोलीस तक्रार दाखल करून बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचले होते. एवढंच नाहीतर या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती.

आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आक्रमक

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हाथरस प्रकरणावर निषेध केला आहे. 'हाथरसमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे.  कुठल्याही पक्षाचे सरकार असेल अशा घटना घडल्या नाही पाहिजेत.  केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारे दहा वेळा विचार करतील', असं अजितदादा म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: October 2, 2020, 1:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या