हा दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारांचा विध्वंस, राऊतांनी आठवलेंना सुनावले

हा दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारांचा विध्वंस, राऊतांनी आठवलेंना सुनावले

निर्भया तेव्हा सगळ्यांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली?

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना या प्रकरणावरून चांगलेच खडबोल सुनावले आहे.

'रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र, हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशातील दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे' असं म्हणत राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली.

तसंच, '2012 साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. संसद बंद पाडली होती. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळय़ांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली? असा सवालही राऊत यांनी उपस्थितीत केला.

'मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक पीडितेच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव… बचाव’ असा आक्रोश करीत तडफडून मेली. पीडितेला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा ‘मीडिया’देखील कंठशोष करताना दिसला नाही. का? ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही' असा परखड सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.

Published by: sachin Salve
First published: October 4, 2020, 9:30 AM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या