पहाटेच्या शपथविधीची खरी स्टोरी, 28 आमदारांना घेऊन अजितदादा फडणवीसांना म्हणाले...

पहाटेच्या शपथविधीची खरी स्टोरी, 28 आमदारांना घेऊन अजितदादा फडणवीसांना म्हणाले...

'आम्ही तुमच्यासोबतच आहोत. माझ्यासोबत 28 आमदार आहे. त्यांना आणि काही अपक्षांना घेऊन बहुमत गाठता येईल', असा दावा पवारांनी केला.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर :  मागील वर्षी पहाटे शपथविधी घेऊन अजित पवार (Ajit pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा हादरा दिला होता. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असताना हा प्रयोग नेमका झालाच कसा, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण, अखेर या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण घडामोड समोर आली आहे.

पहाटे झालेल्या या शपथविधी सोहळ्याची इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकातून समोर आणली आहे. ट्रेडिंग पॉवर (trading power) असं या पुस्तकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकात फडणवीस आणि अजितदादांचा संवाद जशास तसा छापण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेत्याची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली होती.  अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बैठक होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही बैठक पार पडली होती, असा गौप्यस्फोट या पुस्तकात करण्यात आला आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हा फडणवीस यांच्या कार्यालयात जातो आणि पवारांनी आपली भूमिका बदली आहे, असा निरोप देतो.  या निरोपाचा असा अर्थ होता की, 'राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार होती. पण ही शक्यता पूर्ण धूसर झाली आहे. निवडणुकीचा अनुभव पाहता पवारांनी आपला पक्ष आणि प्रतिष्ठा जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला काँग्रेसही पाठिंबा देण्यास उत्सुक आहे, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

त्यानंतर फडणवीस हे आपल्या शासकीय बंगला वर्षा निवास्थानी असताना दुपारी अजित पवार यांचा फोन आला होता. त्यावेळी 'शरद पवार यांनी आपला निर्णय बदलला आहे, असा निरोप अजित पवारांनी फडणवीस यांना दिला होता.

त्यानंतर फडणवीस यांनी, 'शरद पवार हे सेनेला पाठिंबा देऊन सत्ता आपल्या हातात ठेवतील, अशी संधी कोण सोडणार असं म्हणत अजितदादांना, तुमची भूमिका काय? असा सवाल विचारला.

त्यावर अजितदादांनी, 'आम्ही तुमच्यासोबतच आहोत. माझ्यासोबत 28 आमदार आहे. त्यांना आणि काही अपक्षांना घेऊन बहुमत गाठता येईल', असा दावा पवारांनी केला.

त्यानंतर 'ती आमदारं कोण आहे', असं फडणवीस यांनी विचारले असता, अजितदादांनी सर्व नावंच वाचून दाखवली.

यामध्ये  सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय 13 आणखी आमदार असल्याचा दावा अजितदादांनी केला होता.

एवढंच नाहीतर अजित पवार यांनी हे आमदार राज्याबाहेर नेऊ नये, इथंच थांबून आणखी आमदार आपल्यासोबत घेता येईल. 28 आमदार हे इतर आमदारांचे मनपरिवर्तन करण्याचे काम करतील, असा विश्वासही अजितदादांनी फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवला होता.

त्यावर 'आपण सर्वात मोठी जोखीम पत्कारतो आहोत, सगळं काही चोख पार पडलं पाहिजे', असं उत्तर फडणवीस यांनी अजितदादांना दिले.

पण मध्येच अजितदादा आणि फडणवीस यांच्या या कटाची कुणकुण शिवसेनेला लागली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा संवाद झाला.

अजितदादांनी फडणवीसांना फोन करूनच सांगितले की, 'राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे शिवसेनेला कळले आहे, ते सर्व अधिकार शरद पवारांच्या हातात देण्यास तयार झाले आहे.'

हे ऐकून फडणवीसांना धक्का बसला आणि त्यांनी पुढे काय करायचे विचारले.

त्यावर अजितदादा म्हणाले, 'राष्ट्रवादीचे बरेच आमदार हे पवारसाहेबांच्या निर्णयाला पाठिंबा देतील. सेनेला पाठिंबा देऊन पवारसाहेब चूक करताहेत. असं सुप्रियाताई वगळून इतर वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. पण, पवारसाहेब कुणाचेही ऐकण्याचे तयारीत नाही'

मुळात अजितदादांनी सेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकाराला विरोध केला होता. जर सेनेला पाठिंबा दिला तर त्यात राष्ट्रवादी आणि आपले नुकसान होईल, असा अंदाज अजितदादांनी बांधला होता.

त्यातच पार्थला बाजूला करून रोहित पवारांना बळ दिले जात आहे. हे अजितदादांना कुठे तरी खडकतं होतं. तसंच सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे, त्यामुळे आगीत तेल ओतले जात आहे, असाही या पुस्तकात दावा केला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 5:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या