मुंबई, 20 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने मोठा गदारोळ उडाला आहे. या पत्रात परमवीर सिंह यांनी मुंबईतील स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक आणि इतर काही मुद्द्यांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून पैसे वसुली करण्याबाबत बैठका घेतल्या होत्या. तसंच एपीआय सचिन वाझे यांना दर महिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनीच असं पत्र लिहिल्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
'राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलीस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 20, 2021
दरम्यान, आपल्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लगेच स्पष्टीकरण दिलं आहे. 'मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,' असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.