मुंबई, 12 ऑक्टोबर : संपूर्ण मुंबई शहरासह आणि ठाण्यात वीज पुरवठा अचानक ठप्प झाला आहे. एकाचवेळी वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे. मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली आहे तर कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर बेस्ट इलेक्ट्रीकने खुलासा केला आहे.
मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकने ट्वीट करून माहिती दिली आहे. 'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टने दिली आहे. तसंच, झालेल्या गैरसोयीबद्दल बेस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे.
टाटा कडु्न येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान, वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ठप्प झाल्या आहे. सर्व स्थानकांवर लोकल थांबलेल्या आहे. मध्य रेल्वेवर लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्या आहे. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबल्या आहे. गेल्या अर्ध्या तासापासून प्रवासी लोकलमध्ये खोळंबले आहे.
वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या आहे.
कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले आहे. टाटा पॉवरकडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे 380 मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसला आहे.
400 केव्ही कळवा लाईन ट्रिप झाल्याने नवी मुंबई, ठाणे आणि भांडुपमधील काही भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अशी माहिती भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली आहे.