27 फेब्रुवारी : भारतीय वायूदलानं मंगळवारी केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जम्मू-काश्मीरमध्ये आज वायू दलाने पाकचे एफ-16 लढाऊ विमान पाडलं. देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातही हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकारचं सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुंडाळण्याची शक्यता आहे.
मुंबईसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. याच अनुषंगानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली होती.
याची कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सर्व विरोधी पक्षनेत्यांनाही बोलावलं. या बैठकीला विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह महत्त्वाचे इतर नेतेही उपस्थित होते.
या बैठकीत हायअलर्टच्या पर्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील परस्थितीचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
दरम्यान, राज्यात हायअलर्ट घोषीत करण्यात आल्यानं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेनशही उद्याच गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवाहन करण्यात आलं आहे. सर्व रेल्वे प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादर रेल्वे पोलीस ठाणे यांच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.
ही खबरदारी घ्या
1) सर्व रेल्वे प्रवाशांनी त्यांचे दैनंदिन रेल्वे प्रवासात दक्ष राहावे.
02) संशयास्पद वस्तूला कोणीही हात लावू नये.
03) संशयास्पद वस्तू व व्यक्तीची माहीती तात्काळ पोलिसांना द्यावी.
04) कोणीही रेल्वे प्रवाशांनी अनोळखी व्यक्तीचे सामान स्वतःजवळ ठेवून घेऊ नये.
05) रेल्वे प्रवासात लोकल गाड्या उशीरा धावत असल्यास तसेच लोकल गाड्या तांत्रिक कारणामुळे बंद झाल्यास कोणतीही अफवा न पसरवीता गडबड गोंधळ न करता शांतता राखावी व रेल्वे पोलीस व रेल्वे कर्मचारी यांना सहकार्य करावे.
06) रेल्वे प्रवासा दरम्यान रेल्वे स्टेशन, अथवा रेल्वे रूळ, रेल्वे स्टेशन लगत काही संशयास्पद माहिती मिळून आल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.
07) रेल्वे रुळालगत लोखंडी वस्तू ठेवलेली अथवा संशयास्पद वस्तू दिसल्यास त्या गोष्टीची माहीती तात्काळ रेल्वे पोलीसांना द्यावी.
08) दादर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीस गस्त घालून आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संशयित इसमांची व वस्तूंची कसून तपासणी सुरू आहे.
09) रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये येणारे व बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गावर रेल्वे पोलिसांकडून २४ तास तपासणी केली जात आहे. संशयित इसमांची तपासणी चालू आहे. त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे.
10) रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दादर रेल्वे स्टेशनवर कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
11) रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी दादर रेल्वे स्टेशनवर बाहेर राज्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे.
12) रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी डॉग स्कॉड मार्फत सर्व स्टेशन ची तपासणी करण्यात येत आहे.
13) दादर रेल्वे स्टेशनवर दादर रेल्वे पोलिसांकडून घातपात तपासणी तसेच व्हिजिबल पोलिसिंग दरम्यान पायी गस्त राबविण्यात येत असून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे
14) सर्व रेल्वे प्रवाशांना त्यांच्या सुरक्षितते साठी रेल्वे पोलीस हेल्पलाईन नं.१५१२ ही २४ तास सुरू आहे.
15) रेल्वे प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तात्काळ रेल्वे पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
16) रेल्वे स्टेशन वर सशस्त्र कमांडो फोर्स तत्पर आहेत एका मिनिटांत प्रतिसाद देण्याची तयारी आहे
17) प्रवासात आपल्या सोबत प्रवास करणारा व्यक्ती, त्याचं साहित्य, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा. आक्षेपार्ह हालचाली वाटल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
18) आपल्या साहित्याची काळजी स्वतः घ्या.
19) सगळ्याच रेल्वे स्थानकांवर CCTV बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे देखील २४ तास प्रवाश्यांवर कठोर नजर ठेवण्यात येत आहे.
20) मेटेल डिटेक्टर्स मशीनद्वारे गर्दीच्या वेळी पहाणी केली जात आहे
21) रेल्वे पोलीस आपल्या रक्षणासाठी सदैव हजर असून आपले सहकार्य अपेक्षित आहे.
==================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.