मुंबई 26 सप्टेंबर: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने शनिवारी 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 20 हजार 419 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 430 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ही 13 लाख 21 हजार 376 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 69 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.
राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आणि महिनाभरात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा 1 लाखांचा टप्पा गाठला होता.
एकनाथ खडसेंना भाजपनं पुन्हा डावललं; आता वेट करणार की वेगळी वाट निवडणार?
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 2 लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये 2, 4 आणि 5 लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही 7, 8, 9 आणि आज 10 लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला अशी माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अजुनही वाढतच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकार प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नाही. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय.
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांची भेट?
लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus