मुंबई 03 नोव्हेंबर: राज्यातल्या कोरोना रुग्णांचा उतरता आलेख कायम आहे. गेल्या महिनाभरापासून हा आलेख कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 6 हजार 973 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 115 लाख 31 हजार 277 एवढी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा 90.46 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 909 रुग्णांची भर पडली. तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.61 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
कैद्यांवरही होत नसेल असा कोरोनाग्रस्तांवर अत्याचार; दिला जातोय भयानक मृत्यू
दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचंही आरोग्यमंत्री राजेज टोपे यांनी सांगितलं. राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास करून TIFRच्या अहवालात म्हटलं आहे की मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी 80 टक्के तर सोसायट्यांमध्ये राहणारे 55 टक्के लोक हे जानेवारीपर्यंत कोरोनाबाधीत होऊ शकतात. त्याचबरोबर 3 ते 4 महिन्यांमध्ये मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.