Home /News /mumbai /

राज्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे, मुख्यमंत्र्यांचं जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन

राज्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे, मुख्यमंत्र्यांचं जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन

'जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो. अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा'

    मुंबई, 16 मार्च : ' राज्यावर आलेलं कोरोना व्हायरसचं  संकट टाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. राज्यासाठी पुढील 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व जनतेनं योग्य ती खबरदारी घ्यावी', असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'धोक्याची वेळ आलेली नाही. मात्र, काळजीची वेळ आली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 'ज्या देशात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले, त्यानंतर 15 दिवसांनंतर तेथील परिस्थितीत अत्यंत गंभीर झाली होती. त्यामुळे राज्यात आता पुढील 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांनी एकत्र जमू नये. सर्व धर्म गुरूंना, सर्व धार्मिक स्थळांना नम्रता पूर्वक विनंती आहे की, गर्दी होऊ देऊ नका', अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच, परदेशातून जे काही लोकं आली होती. त्यांची तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारकडून जी यादी देण्यात आली होती. त्यानुसार चाचणी केली जात आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हॉटेल बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. काही हॉटेलमध्ये विलगीकरणाची सोय करण्याचा विचार सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. 'सर्व परीक्षा आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे.  जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो. अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, त्याआधी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. 'आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही', अशी महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली. तसंच,  'राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे.  उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील,  पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. 'राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका येऊ घातल्या आहे.  कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे', अशी माहितीही टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत 4, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण 6 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: China, Japan

    पुढील बातम्या