मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरातच धूळ चालणाऱ्या भारतीय संघातला मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गुरुवारी सकाळीच मायदेशी परतला आहे. भारताच्या विजयात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो अजिंक्य राहणे मायदेशी कधी परततो, याचीच वाट मुंबईकर पाहात होते. अपेक्षेप्रमाणे मुंबईकरांनी अजिंक्यचं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्या राहत्या घरी जल्लोषात स्वागत केले.
प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाने ऊर भरून यावा अशीच अजिंक्यची कामगिरी या सीरिजमध्ये राहिली आहे. तब्बल दोन दशकांनंतर भारताला असा ऐतिहासिक विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सर्वांनाच अजिंक्यने केलेल्या नेतृत्वाचं आणि कामगिरीचं कौतुक आहे. अजिंक्यचे कौतुक करत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना शब्द सुचत नव्हते.
या मराठमोळ्या तरुणांचे कौतुक मी स्वतः त्याच्या घरी जाऊन करणार आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. त्यासाठी महापौर यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य रहाणे याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. अजिंक्य रहाणे परदेशातून प्रवास करून आल्यामुळे त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या कुटुंबियांची आणि त्याचबरोबर घरीच विलगीकरणात असलेल्या अजिंक्यची परवानगी घेऊन महापौर त्यांच्या घरी जाऊन अजिंक्यचे कौतुक करणार आहेत.
एका मराठमोळ्या तरुणाने पुन्हा एकदा भारतीय संघाला जो विजय मिळवून दिला आहे त्याबद्दल मला अजिंक्यचे खूप कौतुक आहे, अशी भावना महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. सोबतच अजिंक्य हा एक उत्तम नागरिक आहे त्यामुळे तो सर्व नियमांचे पालन करून घरातच विलगीकरणाात राहील. महापालिकेच्या वतीने दररोज त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. त्यांच्या प्रकृतीत जराही बदल आढळला तर पालिका आवश्यक ती सर्व कारवाई करील अशीही माहिती महापौर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Mumbai