मुंबई, 30 मे: मुंबईच्या खाजगी हॉटेलमध्ये लसीकरण सुरू असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor kishori Pednekar)यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर महापौरांनी द ललित हॉटेल (The lalit hotel) मध्ये धाड टाकून सत्य परिस्थिती जाणून घेतली. या ठिकाणी हॉटेलने कागदपत्र आणि नियमांचे पालन केले आहे का याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पण या ठिकाणी सध्या फ्रिजमध्ये लस (Corona Vaccination) ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता चौकशीची मागणी मुंबईच्या महापौरांनी केली आहे.
मुंबईतील द ललित या हॉटेलकडून 3500 रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर चौकशी करण्यासाठी महापौर थेट द ललितमध्ये पोहोचल्या.
लसीकरणाच्या पॅकेजसंदर्भात माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकरांनी गाठलं द ललित हॉटेल pic.twitter.com/JDwSBw4oH6
— News18Lokmat (@News18lokmat) May 30, 2021
द ललित हॉटेलमध्ये दर दिवसाला 500 लोकांना लस देण्यात येत असल्याची माहिती मिळाली, असं महापौरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे फ्रिजमध्ये कोवॅक्सिन लस आढळून आल्याचं त्यांनी म्हटलं. पण लस ठेवलेला फ्रिज साधा फ्रिज आहे. लसींची साठवण करण्यासाठी योग्य तापमान असणारा फ्रिज नसल्याचं म्हणत यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही त्या म्हणाल्यात.
हेही वाचा- पुण्यात फार्महाऊसवर डान्सबार, दिवसाढवळ्या सुरु होता धांगडधिंगा
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस मोफतच दिली जात आहे. या हॉटेलमध्ये क्रिटीकेअर रुग्णालयानं फ्रॅचायझी घेतली असून त्यासाठी हॉटेलची जागा घेतली आहे. त्यामुळे ललित हॉटेलचा यात जास्त सहभाग नाही. हॉटेलमध्ये लस साठवण क्षमतेबाबत मात्र साशंकता आहे. त्यामुळे यासंदर्भातली तपासणी तातडीनं केली जाणार असल्याचं सांगत क्रिटीकेअर रुग्णालयाकडेही याची चौकशी केली जाणार असल्याचंही महापौर यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.