कोरोना बैठकीत राज्यपालांनी सरकारला केल्या महत्त्वाच्या या 7 सूचना!
कोरोना बैठकीत राज्यपालांनी सरकारला केल्या महत्त्वाच्या या 7 सूचना!
करोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
मुंबई 20 मे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला. यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यपालांनी सरकारला 7 महत्त्वाच्या सूचना केल्या.
येत्या जून व जूलै महिन्यातील करोना बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. करोना संकटाचा मुकाबला करताना बिगर करोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाय योजना करीत आहे याची राज्यपालांनी माहिती घेतली. राज्यात एकूण वैदयकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, इस्पितळातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची राज्यपालांनी यावेळी सूचना केली.
करोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
राज्यातून मजूरांचे स्थलांतर व स्थलांतरितांसाठी सूरु केलेल्या शिबिरांची सदय:स्थिती याचा देखिल राज्यपालांनी आढावा घेतला.
भविष्यातली आव्हान लक्षात घेऊन प्रशासनाने तयार राहावं अशी सूचनाही त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.