मुंबई, 4 जानेवारी : राज्यात नव्या कोरोना (Maharashtra coronavirus) स्ट्रेनची भीती पसरत आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार का? याबद्दल नागरिकांच्या मनात भीती आहे. राज्यात आज10362 रुग्ण बरे होऊ घरे गेले आहेत. तर 2765 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात कोरोना मृत्यूची संख्या कमी होताना दिसत आहे, परंतू मृत्यूदर अद्याप दोन टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात कोरोनाची लागण होणाऱ्या रूग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 1847361 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.88 % एवढा झाला आहे. राज्यात आज 29 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.55% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 13004876 प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी 1947001(14.97 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 241728 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 3078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 48801 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान कोरोना विषाणूमुळे (Covid-19) जगभर पसरलेली साथ आटोक्यात येते आहे असं वाटत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या अवतारामुळे (New strain of coronavirus in UK) दहशत पसरली. भारतातही त्याची लक्षणं काही प्रवाशांमध्ये दिसली, पण महाराष्ट्र अद्याप त्यापासून दूर होता. पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ब्रिटनमधून राज्यात आलेल्या 8 प्रवाशांमध्ये ही नव्या विषाणूची लक्षणं दिसली आहेत. ब्रिटनमधून आलेल्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी होत आहे. त्यात पॉझिटिव्ह आलेल्यांची जिनोम सिक्वेन्सिंगही केलं जातं. अशा विशेष चाचण्यांमधून आता राज्यातल्या 8 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि आता ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india