मुंबई 7 नोव्हेंबर: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट कायम आहे. शनिवारी 3959 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 6748 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 15,69,090 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या एकूण 99,151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.53% झाले आहे अशी माहितीही टोपे यांनी दिलं आहे.
मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाचं एकही लक्षण नाही; मात्र 105 दिवस महिलेच्या शरीरात होता व्हायरस
कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदुषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले.
रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहिम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.