मुंबई, 15 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. पण, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबईची लाईफलाइन सुरू करण्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची सूचक विधान केले आहे.
'मुंबई एकदा सुरू झाली की महाराष्ट्र सुरू होईल. मुंबईही राज्याची राजधानी आहे. जर आर्थिक राजधानी सुरू झाली की, मग महाराष्ट्राचा कारभार व्यवस्थितीत सुरू होईल' असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
'मुंबई कोरोनाबाधितांचा आकडा हा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहे. ते लवकरच निर्णय घेतील' अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईची लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू आहे. लोकल सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतूक मार्गावर परिणाम झाला आहे. एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहे. पण, काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस अपुऱ्या असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.
मुंबईला लागून असलेल्या उपनगरात मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची यामुळे गैरसोय होत आहे. केंद्राकडूनही रेल्वेसह लोकल सेवा 1 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असे आदेश आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची कमी झालेली आकडेवारी पाहता राज्य सरकार मुंबई लोकल सुरू करण्यासाठी काय निर्णय घेईल, हे पाहण्याचे ठरणार आहे.