मुंबई, 6 जानेवारी : औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर व्हावे, या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे, ही शिवसेनेची जुनीच मागणी असली, तरी महाविकास आघाडीत सत्तेत असताना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा चांगलाच रंगला आहे. संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे. मात्र आता माहिती जनसंपर्क संचनालयाच्या एका ट्विटने या वादात चांगलेच तेल ओतले आहे
मंत्रिमंडळ बैठकीतील एका निर्णयाचे ट्विट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) करताना या निर्णयात संभाजीनगर असा सरकारी उल्लेख करण्यात आला आहे, तर औरंगाबाद हा उल्लेख कंसात करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय येथील खाटांची संख्या 165 करण्यात आल्याचे आणि 360 नव्या पदांना मान्यता देण्यात आल्याचे हे ट्विट आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिककार्य मंत्री, लातूरचे काँग्रेस नेते अमित देशमुख यांचा फोटो लावून हे ट्विट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही हे ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
यावरुन औरंगबादचे नामकरण हे संभाजीनगर झाल्याची शासकीय पुष्टीच मिळाल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना राग आवरता आलेला नाही. त्यांनीही ट्विट करत माहिती व जनसंपर्क संचालयनालयाला आणि सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
या ट्विटवरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद थेट चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक निर्णयांत काँग्रेसला डावलले जात असल्याने काँग्रेसचे मंत्री आधीपासूनच नाराज आहेत. महाविकास आघआडीतील किमान समान कार्यक्रमांवर सरकार चालावे, याबाबतचे पत्र खुद्द सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे, यातच हा नामांतराच्या वादावरुन आघाडी सरकारसमोर आव्हान निर्माण झाल्याचे दिसते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Shivsena