Home /News /mumbai /

शिवसेना दूर व्हावी म्हणून तसं बोललो होतो, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना दूर व्हावी म्हणून तसं बोललो होतो, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुळात त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे ते आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आमची ही एक राजकीय चाल होती.

    मुंबई, 13 जुलै : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. पण, पडद्यामागे काय काय घडले होते, याचा सविस्तर उलगडा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सामनाच्या अखेरच्या मुलाखतीच्या भागात केला आहे. 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला, याबद्दल शरद पवारांनी गौप्यस्फोट केला आहे. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपालाही जशास तसे उत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. तीन भागात ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झाली. आज तिसऱ्या भागात शरद पवार यांनी सत्ता स्थापनेवर परखड भाष्य केले आहे. 2014 साली राष्ट्रवादीने  भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सरकार स्थापन झाले होते. पण त्यावेळी, 'माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी' अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यातून शरद पवार यांनी हवा काढून टाकली. 2019 च्या सत्ता स्थापनेच्या वेळी 'शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही… दोनदा नाही… तीनदा बोलले… आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की, प्राईम मिनिस्टरचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला. पण पंतप्रधानांना भेटून नकार दिला' असंही पवारांनी स्पष्ट केलं. संजय राऊत - हे ऑपरेशन कमळ काय आहे? शरद पवार – ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डीस्टॅबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं. संजय राऊत - महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्यानं पसरवलं जातंय. शरद पवार – पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते.. नंतर आता सहा महिने झाले. आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा करतायेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन कमळ असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही. संजय राऊत - देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप आपल्यावर केले मधल्या काळात. ते म्हणतात हा गौप्यस्फोट आहे. त्यात त्यांनी जो पहिला आरोप केला की, 2014 साली तुम्हाला भाजपबरोबर सरकार बनवायचं होतंच. सुरुवातीच्या काळात, तुम्ही पाठिंबा जाहीर केलात. त्यानंतर सरकार शिवसेनेबरोबर बनलं हे खरं, पण मधल्या काळात तुम्ही आणि भाजपचे वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करीत होते असे त्यांनी ठामपणे परवा सांगितलेलं आहे. शरद पवार – त्यांनी सांगितलं… माझ्याही वाचनात आलं, पण गंमत अशी आहे की, हे त्यावेळी कुठे होते हे मला माहीत नाही. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यांचं काय स्थान होतं? हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहीत झाले. त्याच्या आधी विरोधी पक्षातला जागरुक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता. पण सबंध राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये एकदा मी कॉन्शिअसली स्टेटमेंट केलं ते शिवसेना आणि भाजपचे सरकार बनू नये म्हणून… संजय राऊत - हे कशासाठी केलंत? शरद पवार – माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. हे घडलं नाही. त्यांनी सरकार बनवलं आणि चालवलं. त्याच्याबद्दल वाद नाही, पण आमचा हा सतत प्रयत्न होता की, भाजपच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. का? दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात. राज्याची सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच मुळात त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे ते आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आमची ही एक राजकीय चाल होती. संजय राऊत - बरं… म्हणजे फडणवीस जे सांगतात ते आपल्याला मान्य नाही… शरद पवार – अजिबात मान्य नाही.. पण त्यांच्यात व शिवसेनेत हे अंतर वाढावं यासाठी आम्ही जाणीवपूर्वक पावले टाकली हे मी कबूल करतो. संजय राऊत - ते अंतर तर आता वाढलं.. दुसरा आरोप त्यांनी असा केला की, 2019 चं जे तीन पक्षांचं सरकार आता बनलेलं आहे, त्या सरकार स्थापनेच्या दरम्यानसुद्धा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असा त्यांनी उल्लेख केलाय, तेच भाजपबरोबर सरकार बनवण्यासंदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा करत राहिले आणि नंतर पवार साहेबांनी यू-टर्न घेतला. अचानक. शरद पवार – नाही. हे बरोबर नाही. साधी,सरळ गोष्ट आहे की, शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱयांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही… दोनदा नाही… तीनदा बोलले… आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की, प्राईम मिनिस्टरचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला. आणि त्या वेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्र्यांकडे आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लमेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना मी सांगून गेलो की, हे मी त्यांना (पंतप्रधानांना) सांगायला जातोय. मी परत आलो त्यावेळी राऊत तिथेच होते. त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: मुलाखत, राष्ट्रवादी, शरद पवार, संजय राऊत

    पुढील बातम्या