दुकान फोडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाईल लंपास

दुकान फोडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाईल लंपास

गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून चोरीस गेलेल्या 26 मोबाईलपैकी 23 मोबाईल हस्तगत केले आहेत.

  • Share this:

ठाणे, 23 फेब्रुवारी : दुकान फोडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाईल लंपास करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. 12 फेब्रुवारी रोजी घडलेल्या चोरीची तक्रार 21 फेब्रुवारीला केल्यानंतर अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून चोरीस गेलेल्या 26 मोबाईलपैकी 23 मोबाईल हस्तगत केले आहेत.

सर्व आरोपी उत्तरप्रदेश राज्यातील असून मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात असतानाच ते पोलिसांच्या तावडीत सापडले. ठाणे न्यायालयाने सर्व आरोपीना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजस्थान येथील उमेदसिंग राठोड आणि त्यांचा भाऊ किशोर सिंग यांचे भागीदारीत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाका येथे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. 11 फेब्रुवारीला रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यावर चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून दुकानाची लोखंडी ग्रीलचे टाळे तोडले.

तसेच, दुकानातील 1 लाख 70 हजार 850 रुपये किमतीचे 26 मोबाईल लंपास केले होते. हा प्रकार 12 फेब्रु.रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर उघडकीस आला. दरम्यान,किशोर सिंग यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडल्याने राठोड कुटुंबीय गुजरात, वापीला गेल्याने तेथून परतल्यावर याप्रकरणी 21 फेब्रु.रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करणारे उपनिरीक्षक कुलदीप मोरे यांना 22 फेब्रु.रोजी खबऱ्याने,आनंदनगर टीएमटी डेपोनजीक पाचजण स्वस्तात नवीन मोबाईल विकण्यासाठी आल्याची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून पथकाने,त्याठिकाणी धाव घेतली असता संशयित इसम पळू लागले.

नवी मुंबईत कुजलेल्या अवस्थेत सापडल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या डेड बॉडीज

पोलिसांनी पाठलाग करून बिंदू हरिजन,पृथ्वीराज गौड, मोहम्मद आजम अहमदअल्ली ,मोहम्मद परवेज शेख,आणि दिलीपकुमार श्रीराम संजीवन चमार या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगमध्ये 15 मोबाईल आढळले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी कासारवडवली नाक्यावरील मोबाईलचे दुकान फोडल्याची कबुली दिली.

पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत त्यांच्याकडून आणखी 8 मोबाईल हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे सदर आरोपीकडून आतापर्यंत एकूण 23 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

First published: February 23, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading