मुंबई, 7 फेब्रुवारी : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात कोविड 19 संक्रमण काळात महाराष्ट्र सरकारची कामगिरी चांगली नसल्याचा दावा केला. फडणवीस यांच्या या दाव्याला उत्तर देत महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे.
महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहेत असं दिसतं, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात 6 वा होता, अशी माहिती देत सरकारवर होत असलेल्या आरोपांचा प्रतिवाद करण्यात आला आहे.
काय आहे महाराष्ट्र सरकारचा दावा?
महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्ण संख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहीत धरले नव्हते.
एकूण मृत्यूंची सख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दश लक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 647, गोवामध्ये 527, पौंडेचरीत 522, आणि महाराष्ट्रात 403 मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दश लक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.
हेही वाचा - राज ठाकरे Vs राष्ट्रवादी; पवारांवरील टीकेनंतर जयंत पाटलांनी केला पलटवार
महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दश लक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे आरोग्य तपासणी सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाबत जाणीवजागृती करण्यात आली. दोन टप्प्यात राबविलेली ही मोहिम कोरोना रोखण्यात फलदायी ठरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.