मुंबई, 16 नोव्हेंबर : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या मंदिरांचे (temples open)दार अखेर आज उघडले आहे. भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून मंदिरं उघडण्यात आली आहे. पण, मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरुन भाजप आणि शिवसेनेत चढाओढ रंगली आहे. काही ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) नेते मंदिरांमध्ये पोहोचले आहे, तर दुसरीकडे भाजप (BJP) नेते 'आमच्या आंदोलनांमुळे मंदिरं उघडली आहे' असं म्हणत मंदिरांमध्ये पूजा करत आहे.
'ही श्रींची इच्छा', असं म्हणत पाडव्याच्या दिवशी राज्यातील मंदिरं उघडण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरं, देवस्थानांनी मंदिरं उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तर भाजप नेत्यांनीही राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रविवारी संध्याकाळपासूनच राज्यभरातील मंदिरांमध्ये साफ सफाई करून भाविकांसाठी मंदिरं उघडण्यात आली आहे. पण, बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पुण्यात मंदिर उघडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील मंदिरामध्ये शिवसेनेच्या वतीने, सुरक्षित अंतर राखून आरती करण्यात येणार आहे.
तर भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले असं म्हणत, सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले केले. रविवारी सकाळी 9.00 वाजता दगडूशेठ गणपतीची महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असं भाजपने जाहीर केले आहे. एवढंच नाहीतर मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी वाजत गाजत सिद्धीविनायक मंदिरात जाणार असल्याची घोषणाच केली आहे.
दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर तब्बल 8 महिन्यांनी सुरू झालं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा पहिला मान मुंबईतील घाटकोपर इथल्या अमित नाईक यांना मिळाला आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. आज 1 हजारांचे ऑनलाईन बुकिंग झालं आहे. ऑफलाईनसाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. दर तासाला 100 असे 10 तास, आज 1000 भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे.
तर औरंगाबादचे ग्रामदैवत भद्रा मारोती मंदिरही उघडले आहे. सेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भद्रामारुती मंदिर भाविकांसाठी उघडे करण्यात आले. चंद्रकांत खैरे यांनी सर्व प्रथम मंदिर उघडण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.
आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
गेली आठ महिन्यांपासून जास्त काळ जेजुरीचा खंडोबा गड कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद होता. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मंदिरे भाविकांसाठी देव दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. आज पहाटे साडेपाच वाजता आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. देवाची भूपाळी, सनईचे मधुर सूर आणि महाआरतीच्या मंगलमय वातावरणात आज जेजुरीगड जागा झाला.
देव संस्थानाकडून यासाठी शासकीय नियम व अटी पाळत भाविकांना दर्शनाची सुविधा निर्माण केला आहे. सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंगची सुविधा निर्माण केली असून एका वेळी 100 भाविकांना गडकोटात सोडण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून गडकोटात प्रवेश देण्यात येणार आहे तर दर्शनानंतर माघील पश्चिमेच्या दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. भाविकांना कासाववरून मुख दर्शन दिले जाणार आहे.
तुळजाभवानी मंदिराचे दार उघडले
उस्मानाबाद तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर आज पहाटे तुळजाभवानी मंदिराचे दार उघडले पहाटे पाच वाजता आई तुळजाभवानीचे आराधना करून दर्शनाला सुरुवात झाली भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचा सह कर्नाटक आंध्र या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर मध्ये आले आहे.
वैजनाथ मंदिर भाविकासाठी खुले, शिवभक्तामध्ये आनंदाचे वातावरण
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिर कोरोना महामारी का संकटात गेल्या 8 महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद होते. मात्र, राज्य सरकारने आजपासून मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यानंतर योगायोगाने आज सोमवार निमित्त दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आले आहे. वैजनाथ मंदिरात भक्तांनी सोशल डिस्टंसिंग ठेवत मोठ्या शिस्तीत दर्शनाला सुरुवात केली आहे. सुरक्षेची खबरदारी म्हणून जागोजागी सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. परंतु, कोरोना महामारीच्या धर्तीवर राज्यातील सर्वच मंदिरं बंद करण्यात आल्यामुळे भक्तांना दर्शनापासून मुकावे लागले होते. आज पुन्हा एकदा मंदिर दर्शनासाठी खुले केल्याने शिवभक्त मध्ये आनंद पाहायला मिळाला तसेच या मंदिरावरचे अवलंबून असलेले परळी मधील अर्थकारण देखील आता सुरू होण्यास चालना मिळणार आहे यामुळे व्यापारी वर्गातून देखील समाधान व्यक्त करण्यात आले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आज पहाटेपासून दर्शनासाठी खुले
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेले आठ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आज पहाटेपासून दर्शनासाठी खुले झाले आहे. चेन्नईच्या भाविकांनी प्रथम दर्शन घेतले आहे. दरम्यान, विठ्ठल रुक्मिणी गाभारा येथे सुंदर गुलाब , ऑर्किड, झेंडू या फुलांनी सुंदर सजावट केली आहे. निळा, पांढरा ऑर्किड, हिरवा कामिनी अशा पाचशे किलो सुंदर फुलांची सजावट केली आहे. आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असल्याने दर्शन भाविकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी जनतेच आराध्य दैवत असलेल्या विठोबा रखुमाईचे दर्शन आजपासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड दिघीचे भाविक संतोष तानाजी वाळके यांनी ही सजावट केली आहे.
तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच समाधी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी आज उघडण्यात आलं आहे. पहाटे चार वाजताच महाद्वार उघडण्यात आलं आहे. त्या नंतर नित्युपचार पवमान अभिषेक काकड आरती करण्यात आली आणि 6 वाजेपासून वारकरी भक्तांना मंदिरात प्रवेश दिला आहे. या वेळी शासनाने घातलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन इथे केलं जातं आहे. यापुढ दररोज पहाटे रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्सनासाठी हे मंदिर खुले असणार आहे. मात्र, गाभाऱ्यात प्रवेशास मनाई असल्याने भक्तांना माऊलींच्या समधीच दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
साई मंदिर उघडले, दिवसाला फक्त 6000 भक्तांना प्रवेश
गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेले शिर्डीचे साईमंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने भक्तांना असणार असून त्याचे पालन करावे लागणार आहे.
साईबाबांच्या मंदिराची कवाडे आज अखेर उघडली आहे. भाविकांसाठी 17 मार्च रोजी बंद झालेलं दार आज पुन्हा एकदा उघडलं आहे. मात्र, दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला अनेक बंधने असणार आहे. साईमंदिरात दिवसभरात केवळ सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाणार, तीन हजार भाविकांना ऑनलाईन पेड पास बुक करावा लागणार, दोन हजार भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिला जाणार आणि एक हजार ग्रामस्थांना दररोज दर्शन दिले जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.