Home /News /mumbai /

Ratan Tata : एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाकडे, रतन टाटांचा खास संदेश

Ratan Tata : एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाकडे, रतन टाटांचा खास संदेश

केंद्र सरकार (Central Government) आज अधिकृतरित्या एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाकडे सोपवणार आहे. टाटा समूहासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

    मुंबई, 27 जानेवारी : एअर इंडियाची (Air India) सूत्रं आज तब्बल 69 वर्षांनी पुन्हा टाटा समूहाकडे (Tata Group) येणार आहेत. केंद्र सरकार (Central Government) आज अधिकृतरित्या एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाकडे सोपवणार आहे. टाटा समूहासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या पार्श्वभूमीवर, टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी एक खास संदेश प्रवाशांना दिला आहे. गुरुवारी मुंबईतून होणाऱ्या एअर इंडियाच्या चार विमान फेऱ्यांमध्ये अधिक उत्तम दर्जाची भोजन सेवा देऊन टाटा समूह एअर इंडियातील बदलांच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणार आहे, रतन टाटा यांच्या या संदेशाचा हवाला देऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला (PTI) ही माहिती दिली. 'मनीकंट्रोल'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. गुरुवार (27 जानेवारी 22) म्हणजे आजपासून AI864 (मुंबई-दिल्ली), AI687 (मुंबई-दिल्ली), AI945 (मुंबई-अबुधाबी) आणि AI639 (मुंबई-बेंगळुरू) या चार विमानांमध्ये अधिक उत्तम दर्जाची भोजन सेवा प्रदान (Enhanced Meal Service) केली जाईल. अर्थात, गुरुवारी होणारी एअर इंडियाची ही उड्डाणे टाटा समूहाच्या बॅनरखाली होणार नाहीत. कारण कंपनी अधिग्रहणाची संपूर्ण प्रक्रिया गुरुवारनंतर पूर्ण होणार आहे. सर्व औपचारिकता पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे, मात्र गुरुवारी केंद्र सरकारकडून टाटा समूहाला एअर इंडियाची सूत्रं सोपवली जातील. एअर इंडियाची सूत्रं टाटा समूहाकडे आल्यामुळे होणाऱ्या सुधारणांची ही एक झलक आहे. ('6 महिने टी-20 मधून ब्रेक घेतोय', T20 World Cup खेळणार नाही दिग्गज खेळाडू!) तोट्यात चाललेल्या एअर इंडिया कंपनीतील सरकारचा हिस्सा विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावत, ही कंपनी विकत घेतली. 8 ऑक्टोबर 21 रोजी टाटा समूहाची उपकंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडनं (Tales Private Limited) 18,000 कोटी रुपयांना एअर इंडिया ही कंपनी खरेदी केली. 88 वर्षांपूर्वी 1932 मध्ये टाटा समूहाचे जे. आर.डी टाटा (J. R. D Tata) यांनी टाटा एअर सर्व्हिसेस नावानं विमानसेवा कंपनीची स्थापना केली होती. मात्र 1947 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारनं राष्ट्रीयीकरण करून ही कंपनी सरकारच्या अखत्यारित घेतली आणि एअर इंडिया असं नामकरण केलं. अनेक वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात चालल्यानं सरकारला हजारो कोटी रुपयांचे भांडवल त्यात ओतावे लागत होते. त्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या कंपनीतील सरकारचा सर्व हिस्सा विकून याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. टाटा समूहाचे एअर इंडियाशी भावनिक बंध असल्यानं या समूहाने अखेर 69 वर्षांनी पुन्हा एकदा एअर इंडिया टाटा समूहात सामील करून घेतली. एअर इंडिया आता टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली नवी झेप घेण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, इंडियन पायलट गिल्ड (IPG) आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) या दोन एअरलाइन पायलट्सच्या संघटनांनी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. याचे कारण वैमानिकांना देण्यात येणाऱ्या वेतन आणि भत्ते यांच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणात कपात केली जाणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय, उड्डाणांच्या आधी विमानतळांवर क्रू मेंबर्सचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजला जावा असा आदेश 20 जानेवारी 22 रोजी देण्यात आला आहे, त्याला एअर इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन (AIEU) आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन (AICCA) या दोन संघटनांनी विरोध केला आहे. हा आदेश अमानवी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचं या संघटनानी व्यवस्थापकीय संचालक विक्रम देव दत्त यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. एअर इंडियाची सूत्रं हाती घेतल्यानंतर टाटा समूहाला अशा काही समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे.
    First published:

    पुढील बातम्या