या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम, दिली 'ही' ऑफर

या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम, दिली 'ही' ऑफर

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देऊ केले आहे.

  • Share this:

मुंबई,30 ऑक्टोबर: मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना येत्या 3 नोव्हेंबरनंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देऊ केले आहे. याशिवाय 16 मंत्रिपदेही देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. त्यात अर्थ, कृषी आणि गृहराज्यमंत्री पदाचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

विशेष म्हणजे शपथविधी एकट्या भाजपचा होणार नाही तर शिवसेना-भाजपचा सोबत होईल, असे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करुनच तोडगा काढतील, असेही महाजन यांनी सांगितले आहे. सत्तासंघर्षासाठी वेळ लागत नाही. 2-3 दिवसांत तिन्ही नेते एकत्र बसतील त्यानंतर निर्णय होईल. नंतर महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. शिवसेना-भाजप मिळून आम्ही सरकार स्थापन करु, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

भिक मागत नाही.. हे राजकारण आहे..

आमच्याकडे 17-18 अपक्ष आहेत. त्यांच्याकडे (शिवसेना) 5 अपक्ष आहेत. आम्ही कुठलीही अपक्षांची भिक मागत नाहीत. हे राजकारण असल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री असू, शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही ठराव झाला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यावरून शिवसेना-भाजपमध्ये तणाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वादानंतर सेना-भाजपची कालची बैठक रद्द झाली. शिवाय शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडीओ शेअर करुन, ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देण्यात आली आहे.

'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका'

भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठरलेल्या सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलानुसारच वाटप होईल असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. तसंच जे ठरलंय ते भाजप नक्की देईल पण शिवसेनेनं त्याच्यापेक्षा जास्तची मागणी करू नये असा टोलाही दानवेंनी लगावला.

भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता..

भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडला आपला विधिमंडळ नेता निवडला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानभवन परिसरात भाजपचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. देवेंद्र फडणवीस तीन टर्म पूर्ण करोत, अशा शुभेच्छाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. भाजपच्या केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांच्या नेतृत्त्वात ही प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणीस यांच्या विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड करण्यात आली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

दुसरीकडे,'मातोश्री'वर शिवसेनेची खलबते सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी उद्या (गुरूवार) दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. आदित्य ठाकरे यांचा उद्या होणारा नियोजित कोकण दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्या ‘मातोश्री’वर पक्षनेत्यांची खलबते सुरु आहेत. राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

विधिमंडळाच्या बैठकीत पराभूत पंकजा मुंडेंचाही समावेश...

परळी विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागलेल्या पंकजा मुंडे यांनी विधिमंडळ बैठकीला उपस्थिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात केली.

सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही: पृथ्वीराज चव्हाण

सत्तेसाठी भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. पण जर काही प्रस्ताव सेनेने दिला तर त्यावर काँग्रेस विचार करील. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकार बनवून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही. भाजप सेनेने ठरवायचे आहे सरकार कसे स्थापन करायचे. दोघांच्या भांडणात जनतेचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहे. काही झाले तरी दबावतंत्र वापरुन भाजप सेनेला बरोबर घेऊ शकते, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

Published by: Sandip Parolekar
First published: October 30, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading