मोहन जाधव, प्रतिनिधी
मुंबई, 01 एप्रिल : मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीवर एक पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण या बोटीवर कुणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचा खुलासा झाला आहे. समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर ही बोट संपर्क तुटल्यामुळे भरकटली आहे.
मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून 44 नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे या बोटीमध्ये कोणतीही पाकिस्तानी व्यक्ती आढळून आली नाही. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.
जलराणी असं या बोटीचं नाव आहे. ही बोट उत्तनमधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. 2 वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.
आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व 15 खलाशांची हे पाकिस्तानी नसल्याचे समोर आहे. या सर्वांकडे आधार कार्ड असल्याचे समोर आले आहे, असं कोलासो यांनी सांगितलं.
ही बोट मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला असून उत्तन किनारी तिने परतावे, अशा सूचना दिली आहे. या बोटीला किनाऱ्यावर येण्यासाठी रात्र होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.