बीड, 18 मार्च : नुकतेच जयसिंघानी नावाच्या तरुणीने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचं प्रकरण समोर आलं होतं. विधानसभेत खुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानी यांचा फोटो भाजपने ट्विट केला होता. यावर ठाकरे गटाने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही चौकशी करा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
काय आहे मागणी?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानी यांचा फोटो भाजपने ट्विट केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. कारण ज्यावेळी जयसिंघानी हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्या उल्हासनगर भागातून आले होते. त्याचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे होते आणि मातोश्रीमध्ये जर एखाद्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची असते, त्यावेळी जोपर्यंत जिल्हाध्यक्षांचं कन्फर्मेशन नसेल तोपर्यंत त्यांना प्रवेश मिळत नव्हता. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनीच जयसिंघानी यांची ठाकरेंसोबत भेट घालून दिली होती का? याची पण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या बीडच्या अंबाजोगाई येथे माध्यमांशी बोलत होत्या.
वाचा - 'फक्त 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख..' बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक
अंधारे पुढे म्हणाल्या, की ज्यावेळेस अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली, त्यावेळी नैतिक जबाबदारी म्हणून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता दस्तूर खुद्द गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विषयीचं प्रकरण आहे. त्यामुळे त्यांनी देखील आता नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. तीन-चार खाते आहेत, एक खात सोडलं म्हणून काय झालं? एवढी सत्ताकांक्षा बरी नव्हे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना टोला देखील लगावला आहे. त्याचबरोबर जर फडणवीसांनी राजीनामा दिला तर या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल. त्यामुळं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अशी देखील मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की यामध्ये काही मित्र देखील सहभागी आहेत. त्यामुळे ते मित्र कोण? त्यांचे नावे जाहीर करावीत, अशी मागणी देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.