Home /News /mumbai /

सुशांत प्रकरणात भाजपच्या आयटी सेलने फेक अकाऊंट काढून केली बदनामी, गृहमंत्र्यांचा आरोप

सुशांत प्रकरणात भाजपच्या आयटी सेलने फेक अकाऊंट काढून केली बदनामी, गृहमंत्र्यांचा आरोप

'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एका राजकीय पक्षाने सुपारी उचलली होती. या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची बदनामी केली आहे'

मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपवर एकच हल्लाबोल केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांनी बदनामी करणाऱ्या भाजप नेत्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसंच, भाजपच्या आयटी सेलने या प्रकरणात फेक अकाऊंट काढल्याचा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. 'सुशांत सिंह प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट काय आहे, याची वाट आम्ही पाहत आहेत.  रिपोर्ट लवकर जाहीर करावा, त्यामुळे हत्या आत्महत्या होती हे स्पष्ट होईल', असं अनिल देशमुख म्हणाले. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एका राजकीय पक्षाने सुपारी उचलली होती. या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  महाराष्ट्राची बदनामी केली आहे.  महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केली.  मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली होती. त्यामुळे भाजपने राज्याची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही अनिल देशमुखांनी थेट भाजपकडे केली आहे. तसंच, सुशांत सिंह प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी बाहेर राज्यातील 'कठपुतली'चा वापर केला आहे. या कठपुतलीने महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम केले आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी कंगनाचे नाव न घेता केली. सुशांत प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या आयटी सेलनेच फेक अकाऊंट काढून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची  बदनामी केली आहे.  सायबर क्राईम पोलीस या प्रकाराचा तपास करत आहे, या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे,  सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, ट्वीटरवर हजारो अशी फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या  होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे.जवळपास 80 हजार फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या फेक अकाऊंटच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेक पोस्ट करण्यात आल्या होता. यामध्ये #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR अशा हॅशटॅगचा वापर करून सरकारविरोधात मोहिम राबवण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Anil deshmukh, Mumbai police, अनिल देशमुख, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या