मुंबई, 19 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुंबई पोलिसांना या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास सांगितले. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.
'मुंबई पोलीस सुशांत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशीची गरज नाही,' अशी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर धक्का बसला आहे. मात्र असं असलं तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे.
'सत्यमेव जयते', असं सूचक ट्वीट पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहेत.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी आपली प्रतिक्रिया दिली होती. सुप्रीम कोर्ट आज निर्णय देईल, त्यानंतर राज्य सरकार पुढील भूमिका घेईल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.
गृहमंत्र्यांच्या राजीनामाच्या मागणी
'महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी 2 महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंहच्या परिवाराला न्याय मिळेल,' अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.