Home /News /mumbai /

रोहित पवारांनी घेतली पार्थ पवारांहून वेगळी भूमिका, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी म्हणाले...

रोहित पवारांनी घेतली पार्थ पवारांहून वेगळी भूमिका, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी म्हणाले...

राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली आहे.

    मुंबई, 1 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर (Sushant singh rajput suicide) आरोपांची राळ उठली आहे. सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हणत बॉलिवूडमधील दिग्गजांना लक्ष्य केलं जात आहे, तर दुसरीकडे याप्रकरणी योग्य दिशेने तपास होत नसल्याचं म्हणत राज्य सरकारवरही निशाणा साधला जात आहे. तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. यामुळे वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या वादात उडी घेतली आहे. 'गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे,' अशी भूमिका घेत रोहित पवार हे मुंबई पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र आता रोहित पवार हे पोलिसांचाच तपास योग्य दिशेने जात असल्याचं सांगताना पाहायला मिळाले. काय आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट? "बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय... पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक दिवस अचानक दृष्ट लागावी तसं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच तो आत्महत्या करतो काय... अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरुवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे. पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहीत नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टीव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. मात्र एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, पण आज कोरोनाच्या संकटाचा काळ आहे. हातावर पोट असलेले, छोटे-मोठे उद्योजक, कामगार यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ आलीय. काहींनी आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्यात. सिनेसृष्टीचा विचार केला तर स्पॉटबॉयपासून पडद्यामागचे कलाकार, सहकलाकार व पूरक व्यावसायिक असे अनेकजण आज आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यातील काहींनी आत्महत्याही केली असेल. अचानक केलेल्या लोकडाऊनमुळे सुरुवातीच्या काळात अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. काहीजण तर चालत्या रेल्वेतूनच अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे जिवंतपणीच मरणयातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. यावर कुणीच काही का बोलत नाही? की ते आपल्या समाजाचा भाग नाही? की ती हाडा-मांसाची माणसं नाहीत? की ते सेलिब्रिटी नसून गरीब असल्याने आपण बोलत नाहीत? की आपल्या संवेदना बोथट झाल्या? की आपल्याला काही दिसतंच नाही? आपला देश म्हणजे कायद्याचं राज्य आहे. असं असेल तर तिथं सर्वांना समान न्याय हा मिळालाच पाहिजे. म्हणूनच सुशांतच्या अकाली जाण्याचा निःपक्षपाती तपास झालाच पाहिजे आणि कोरोनाच्या संकटामुळे कुणावर आत्महत्येची वेळ येणार नाही याचीही दक्षता आपण घ्यायला पाहिजे. याबाबत देशातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार यांनी भेदभाव, राजकारण, हेवेदावे हे विसरुन एकत्रित काम करायलाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतो."
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: NCP, Parth pawar, Rohit pawar

    पुढील बातम्या